पुणे – ‘पुणे तिथे काय उणे’ असे नेहमीच म्हटले जाते. पुणे म्हटले की पाटीची चर्चा होणारच, आता महापालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत, असे वक्तव्य करणारे भाजपचे खासदार संजय काकडे यांना अज्ञात कार्यकर्त्यांनी पुणेरी भाषेत टोमणा हाणला आहे. ‘पुणेकरांनो तुमचा आमच्यावर भरवसा नाय काय? तुम्ही एका पेक्षा एका बावळटांना निवडून दिले काय!’ असे बॅनर लावण्यात आले आहे.
‘पुणेकर बंधू आणि भगिनींनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये’ असे फलक लावून काकडे यांना घरचा आहेर दिला आहे. हे फलक लावणारे अज्ञात कार्यकर्ते हे भाजपाचे आहेत का विरोधी पक्षाचे हे मात्र कळू शकलेलं नाहीये. असं असलं तरी ‘बावळटपणाची ही टवाळी’ चर्चेवरून फलकांवर आली आहे.
24 तास समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत, जलवाहिनीच्या कामाची 1718 कोटी रुपये आणि पाणी मीटरची604 कोटी रुपयांच्या कामाची निविदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली. असे असताना महापालिकेतील आमचे पदाधिकारी हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असे म्हणत असतील, तर ते बावळट आहेत, अशी खरमरीत टीका खासदार काकडे यांनी केली होती. आपल्याच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बावळट ठरविल्याने काकडे झोतात आले होते. या पार्श्वभूमीवर शहरात काकडे यांच्यावर कुरघोडी करणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.
COMMENTS