बारामती – देशातील पहिले भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती येथे उभारण्यात आले आहे. देश-राज्यातील भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी या प्रकल्पातील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणारा प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केला.
कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन कृषीमंत्री श्री. फुंडकर व नेदरलँडचे कृषीमंत्री ॲल्ड्रीक खिअरवेल्ड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलपती के. विश्वनाथन, जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते उपस्थित होते.
श्री. फुंडकर यावेळी म्हणाले, देशातील पहिले भाजीपाला गुणवत्त्ता केंद्र राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च दर्जाची बियाणे, रोपे यावर संशोधन करता येणार आहे. राज्यातील शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
राज्यातील शेती क्षेत्रातील आव्हाने सोडविण्यासाठी थिंक टँक सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतमाल उत्पादनात वाढ होण्यासाठी जिल्हानिहाय कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनेच महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांना निर्यातक्षम मालाचे उत्पादन घेण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करणार आहे. शेतीक्षेत्रात मुलीं उल्लेखणीय काम करत असल्याबद्दल श्री. फुंडकर यांनी समाधान व्यक्त केले.
माजी कृषीमंत्री श्री. पवार म्हणाले, भाजीपाला गुणवत्ता केंद्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत उच्च दर्जाचे बि-बियाणे पोहचणार असून शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मार्गदर्शक केंद्र ठरणार आहे. देशातील कृषी क्षेत्रात खूप संधी आहेत. आगामी काळात दूध डेअरीसंदर्भात गुणवत्ता प्रकल्प उभारण्याचा विचार असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
नेदरलँडचे कृषीमंत्री श्री. खिअरवेल्ड म्हणाले, कृषी क्षेत्राविषयी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार आहे. कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राज्य व जिल्ह्यातून शेतकरी, कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS