नवी दिल्ली – संयुक्त जनता दलावरील वर्चस्वाची लढाई गमावलेले ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. जदयूचे चिन्ह नीतीशकुमार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाला त्यांनी अगोदरच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासोबतच नवीन पक्ष काढण्याच्या हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत.
शरद यादव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना तीन दिवसांच्या आत नवीन पक्षाचे नाव सुचवण्यास सांगितले आहे. पक्षाचे नाव एक आठवड्यात जाहीर करण्यात येईल.शरद यादव यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील संयुक्त जनता दलावरील आपला दावा सांगत म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता नवीन पक्षाची स्थापना करणे आता आवश्यक आहे.
यादव यांनी स्वतंत्र जेडीयू च्या ‘राष्ट्रीय कार्यकारिणी’ची स्थापना केली होती आणि छोटुभाई वासवा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. पक्ष आणि त्याचा निवडणूक चिन्ह ‘बाण’ वर दावा सांगत वासवा यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र वासवा यांनी गुजरात निवडणुकीच्या कारणावरून पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी तमिळनाडूचे नेते राजशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने निर्णयाला विलंब केल्यामुळे शरद गटाला गुजरातमध्ये काँग्रेस सोबत निवडणूक लढण्यासाठी नवा पक्ष स्थापन करावी लागत आहे. असे यादव गटाचे नेते अनिल श्रीवास्तव म्हणाले.
शरद यांच्या नव्या पक्षाची घोषणा करण्याबाबत श्रीवास्तव म्हणाले की, एका आठवड्यात पक्षाचे नाव निश्चित करण्यात येईल. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये नव्या पक्षाचे राष्ट्रीय सम्मेलन आयोजित करण्यात येईल. आयोगामध्ये जेडीयूवर दावा करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू राहील, परंतु यामुळे राजकीय हेतू प्रभावित होऊ नये यासाठी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
COMMENTS