मला धनगर समाजापुरता अडकून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे विधान राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी हे विधान केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि आरक्षणामुळे मी मंत्री झालेलो नाही, असे ते म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत मला धनगरांची मते मिळालेली नाहीत. त्यांनी मते दिली असती तर आज मी केंद्रात कॅबिनेट मंत्री असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षण रखडले, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाच्या मागणीने जोर धरलेला असतानाच मंत्री महादेव जानकर यांनी आरक्षणाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे.
COMMENTS