नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे काय म्हणाले शेतकरी संपाबाबत ?

नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे काय म्हणाले शेतकरी संपाबाबत ?

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात संप पुकारला असून विविध राजकीय पक्षांच्या पाठिंब्यानंतर आता ‘नाम’ फाऊंडेशननेही या संपाला पाठिंबा दिलाय. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.‘संपामुळे कुणी नाडला जाऊ नये’ जगण्यासाठी संप करावा लागतो हे वाईट गोष्ट असल्याची भावना यावेळी नाना पाटेकर यांनी व्यक्त करत शेतकरी संघटित झाला तर ती सर्वात मोठी ताकद, असल्याचेही ते म्हणाले.  

नाना पाटेकर म्हणाले की, ‘आमचा शेतक-यांच्या या संपाला पाठिंबा आहे. शेतक-यांनी एक संघटना तयार करून समोर यावं. मी माझ्या शेतक-यांनी अशी विनंती करू शकतो की, या गोष्टीसाठी सर्वांनी एकत्र या पण जाळपोळ, हिंसक वळण या आंदोलनाला लागू देऊ नका. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी बोलताना अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, ‘जो गळफास घेऊ शकतो तो गळफास देऊही शकतो, संपामुळे शेतकरी बांधव एकत्र आले हे महत्वाचं आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’ शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नका. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू व्हाव्यात’ आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार नको, असे मकरंद अनासपुरे म्हणाले.

दरम्यान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नावाने सोशल मीडियातून मेसेजेस व्हायरल होताहेत त्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मकरंद अनासपुरे म्हणाले की, आम्ही ते लिहिलेलं नाही. आम्ही आमची भूमिका आमच्या अधिकॄत पेजेसवरच मांडतो किंवा मीडियासमोर मांडतो. खोटे मेसेजेस लोकांनी पसरवू नये’.

 

COMMENTS