महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली. दरम्यान, अवघ्या तासाभरातच राणेंना एनडीएमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले असून राणेंनीही हे आमंत्रणही स्वीकारल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
त्यामुळे एनडीएमध्ये सामील होण्याबाबत नारायण राणे यांच्या औपचारिक घोषणेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राणे औपचारिक घोषणा कधी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आगामी काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचा समावेश होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला न विचारताच भाजपने राणेंना एनडीएत सहभागी होण्याचं आमंत्रण दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राणेंना एनडीएत सहभागी करण्याच्या निर्णयास शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे .
दरम्यान, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज (रविवार) राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे पक्षाचे नाव असून पक्षाचा झेंडा आणि चिन्ह लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती राणे यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
COMMENTS