मंदीत नोटाबंदी करून आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचा टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरून सरकारला धारेवर धरले आहे.
इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियना एक्सप्रेस’च्या लेखच्या माध्यमातून सिन्हा यांनी देशाचे विद्यमान अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी अत्यंत जवळून गरिबी पाहिली आहे. त्याचवेळी , देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस रात्र मेहनत करतायेत’ अशी टीका यशवंत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर केली आहे. शिवाय, अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करून ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखे होईल, मला माहित आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत’, असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटले आहे.
कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. खासगी गुंतवणुकीत घट आली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादन खूपच घसरले आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे. उत्पादन, रोजगार, सेवा आदी क्षेत्र संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे. नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. नोटाबंदीचा निर्णय खूपच चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. लाखोंना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होत आहे. जीडीपी ५.७ टक्क्यांवर आला. गेल्या तीन वर्षांतील निचांकी नोंदवली. पण नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जाते. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
COMMENTS