पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आज आहे – त्यानिमित्त…..
राजकारणातील धगधगती मशाल -पंकजा गोपीनाथ मुंडे
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या काळात जी काही नावं प्रकर्षाने चर्चिली जातात किंवा प्रकाश झोतात आहेत त्यामध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय,देशाच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी पंकजा यांच्यावर नियतीने अचानक टाकली नव्हे लादली,मनिध्यानी नसताना मुंडेंचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर पंकजा यांच्यामध्ये साहेबांना पाहण्याचा जनतेचा कौल,आशा परिस्थितीत पंकजा यांनी जो आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्याला तोड नाही.
विदेशात शिक्षण घेतलेल्या पंकजा यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांना परत आपल्या भागात यावं लागेल,एवढ्या मोठ्या घरची लेक,लग्न ,संसार यात रममाण झालेली असताना आठ वर्षांपूर्वी अचानक त्यांच्यावर पक्षाने विधान सभेची जबाबदारी टाकली अन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला,त्या अगोदर काही वर्षे त्यांनी आपल्या बाबांसाठी या भागात प्रचाराच्या माध्यमातून राजकारण प्रवेश केला होता मात्र त्यावेळी त्यांनाही याची कल्पना नसावी की भविष्यात त्यांच्यावरच एवढी मोठी जिमेदारी येईल म्हणून.
एकीकडे धनंजय मुंडे यांच्यासारख्या सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या भावाने साथ सोडलेली असताना आणि वडिलांचे छञ हरपले असताना पंकजा यांनी लोकमताच्या आशीर्वादावर राजकारणाच्या आखाड्यात आपले पाय घट्ट रोवायला सुरवात केली होती.नशिबानेच जर ही जबाबदारी दिली असेल तर आलेल्या परिस्थितीला तोंड देत संघर्ष करायचा हे बाळकडू वडिलांकडून मिळाल्याने पंकजा यांनी न डगमगता हे शिवधनुष्य पेलले.वडीलांपासून मिळालेला संघर्षाचा वारसा त्यांनी पुढेही यशस्वी पणे पेलला.महाराष्ट्रात संघर्ष यात्रेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचाच उल्लेख असेल हे कोणीही नाकारू शकणार नाही.
ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.
शर्त यही है कोई प्यासा हार न माने तो,
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है.
अस काहीसं पंकजा यांच्याबाबतीत म्हटल्यास ते वावग ठरणार नाही.
पंकजा मुंडे यांना जे लोक जवळून ओळखतात ते दुसरे साहेब म्हणूनच सांगतात,वागण्या,बोलण्याची तीच पद्धत,भाषणातील चढ उतार सारखेच,डोळे बंद करून जर कोणी पंकजा यांचे भाषण ऐकले तर त्याला मुंडे साहेबांची आठवण येणार हे नक्की.त्यांनी मुंडे साहेबांचा फक्त एकच गुण घेतला नाही तो म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यालादेखील एंटरटेन करण्याचा.एवढ्या बाबतीत त्या थोड्या वेगळ्या वाटतात,नव्हे आहेतच.विनाकारण नको ती काम आणत जाऊ नका,बदल्या,नोकऱ्या,गुत्तेदारी ही माझी काम नाहीत,गावाचा विकास,गावचे प्रश्न,समस्या याबाबत माझ्याकडे या एवढं थेटपणे बोलणारा राजकारणी आजकाल पहावयास मिळत नाही.कदाचित अनेकांना त्यांचा हा स्वभाव खटकतो मात्र त्याला इलाज नाही.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे ग्रामविकास सारख्या खात्याला देखील नवे आयाम मिळाले. बीड जिल्ह्यात तर त्यांनी रस्ते,आरोग्य, वीज यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला.राजकारण हे निवडणुकीपूरत करायचं नंतर विकास हे एकच लक्ष डोक्यात ठेवायचे हा मंत्र त्यांनी जपला आहे.
बिनधास्त,बेधडक,जे आहे ते तोंडावर,पुढे एक मागे एक,असा पंकजा यांचा स्वभाव दिसत नाही.त्यांच्या थेट बोलण्यामुळे अनेकवेळा जवळचे लोक देखील दुखावतात मात्र त्यांना स्वभाव माहीत असल्याने ते समजून घेतात.ग्रामविकास बरोबरच त्यांनी जलयुक्त शिवरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शिवारात जे हिरवं सपान फुलवण्याचा प्रयत्न केला तो विशेष म्हणावा लागेल,सरकारी योजना लालफितीत अडकतात हा आजवरचा अनुभव मात्र पंकजा मुंडे यांनी जलयुक्त सारखी योजना थेट बांधावर जाऊन राबवण्यास लावली.बिडकरांच्या जिव्हाळ्याच्या नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न त्यांनी दोन वर्षात मार्गी लावला.
फडणवीस सरकारमधील जे काही चार दोन चेहरे चर्चेत असतात त्यातील एक म्हणजे पंकजा मुंडे होय.तथाकथित चिक्की घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता मात्र त्यांनी त्यावर मात केली, मंत्री पदावर असतानाही कुटुंबाला वेळ देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो . राज्यात त्या कोठेही असल्या तरी मतदार संघावर नेहमी लक्ष असतं हे ही तेवढंच खरं, अर्थात राजकारणाच्या आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या बदलत्या तंत्राबाबत त्या तितक्याश्या माहीर नाहीत हे देखील वेळोवेळी जाणवतं, मुंडे साहेब ज्या पद्धतीने जुगाड करून विजय मिळवायचे ती पद्धत कदाचित अद्याप पंकजा यांच्या अंगी यायला वेळ लागेल,मात्र त्याची चुणूक त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिली.
पंकजा मुंडे या जर राजकारणा ऐवजी एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या मालक असत्या तर ती कंपनी त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेली असती हे नक्की,अर्थात त्या आज ज्या क्षेत्रात आहेत तेथेही त्यांचे काम आभाळाएव्हढे मोठे आहे यात शंका नाही.राजकारणी माणसं नेहमी खोटं बोलतात,वेळकाढू पणा करतात,तोंडपूरत बोलतात असा अनेकांचा अनुभव आहे मात्र पंकजा मुंडे याला अपवाद आहेत.काम होत असेल तर हो म्हणणार नाहीतर नाही म्हणून तोंडावर सांगायला सुद्धा धमक लागते ती पंकजा यांच्यामध्ये दिसते. अलीकडच्या काळात त्या बऱ्याच वेळा कठोर शब्दात बोलायचे टाळू लागल्याचं दिसतं, कदाचित राजकारणातील अनुभवाचा तो भाग असावा,मात्र हा बदल अनेकांना सुखावणारा आहे. रात्री अपरात्री आपले फोन घेतले जावेत,आपली अडचण ऐकून घेतली जावी ही कार्यकर्त्यांची ईच्छा असते मात्र एक महिला म्हणून त्यांनाही काही बंधन आहे याचा विचार करायला हवा.
गोपीनाथ मुंडे यांनी जनकल्याणाचा जो वसा त्यांना सुपूर्द केला आहे तो त्या पूर्ण करतील यात काही शंका नाही.त्यांच्या हातून जनसेवेच हे यज्ञकुंड अखंड धगधगत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,पंकजा ताई आपणाला दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!
COMMENTS