भगवान गड येथे पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेण्यास नामदेव शास्त्री आणि प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर हा मेळावा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील संमती दर्शवली आहे. शनिवारी सावरगाव घाट येथे दणक्यात मेळावा साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.
महिनाभरापासून भगवानगडावर दसरा मेळावा होणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम होता. पाथर्डी तहसीलदार यांनी भगवान गडावर मेळावा घेण्यास गुरुवारी परवानगी नाकारली. त्यानंतर कोठेच मेळावा घ्यायचा नाही अशा निर्णयावर पंकजा मुंडे आल्या होत्या. परंतु सावरगाव घाट येथील हजार ते दीड हजार ग्रामस्थांनी संध्याकाळी बैठक घेऊन सावरगाव येथे मेळावा घेण्याचा आग्रह धरला. तेथूनच पंकजा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली गेली. पंकजा यांनी अखेर सावरगाव येथे मेळावा घेण्यास संमती दिली,त्यामुळे शनिवारी सावरगाव येथे मेळावा होणार आहे. ट्विटरवरही पंकजा यांनी ही माहिती दिली आहे.
COMMENTS