मंदार लोहोकरे, पंढरपूर
पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी पुजारी आणि भाविकांमध्ये जोरदार वाद झाला. विठ्ठलाच्या गळ्यात हार घालण्याचा प्रय़त्न केल्याने एका पुजा-यानं दत्तात्रय सुसे या भाविकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांत पुजा-याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील काही भाविक सकाळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. दर्शन रांगेतून हे भाविक साधारतः सकाळी साडे सहाच्या दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्भगृहात पोहचले. यातील दत्तात्रय सुसे या भाविकाने श्री विठ्ठलाला आणलेला पुष्पहार मूर्तीवर टाकला. परंतु तो हार मूर्तीच्या मागे जाऊन पडला. यावेळी मंदिराचे पुजारी अशोक भणगे यांनी असे मूर्तीवर हार का टाकला ? असे विचारात त्या पुजा-याने सुसे यांना मारहाण केली. या बाबत सुसे यांनी थेट पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठून भणगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मंदिरात झाल्या प्रकाराची मंदिर समितीने चौकशी सुरु केली. या मध्ये पुजारी भणगे यांनी मारहाण केल्याचे निदर्शनास आले. पूर्वी मंदिरातील बडवे भाविकांना त्रास देत होते. आता ते बडवे गेले आणि शासकीय बडवे भाविकांना त्रास देत आहेत. त्याचाही बंदोबस्त करा अशी मागणी भाविकातून होत आहे.
दोषी आढळल्यास पुजा-यावर कारवाई – महाजन
मंदिरातील मूर्तीवर भाविकांनी हळद ,कुंकू, बुक्का, फुले, हार आदी टाकू नयेत असा नियम आहे. भाविकाने हा नियम पाळला नाही. तरीही मारहाण समर्थनीय नाही. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषी असल्यास पुजा-यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले.
COMMENTS