‘पठाणी’ कायद्यापेक्षा सत्य स्वीकारा व आत्मचिंतन करा,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

‘पठाणी’ कायद्यापेक्षा सत्य स्वीकारा व आत्मचिंतन करा,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

मुंबई – मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून टवाळी करताना या संयमाची व सौजन्याची ऐशी की तैशी करणाऱ्यांचीच अवस्था आता सोशल मीडिया सोसवेना अशी झाली आहे. तरुणांना धमक्या देणे व ‘पठाणी’ कारवाया करणे हा त्यावरचा मार्ग नसून सत्य स्वीकारा व आत्मचिंतन करा हा उपाय आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला आहे.

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरास पायबंद घालण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सामनामधून निशाणा साधला आहे.

विविध सोशल मीडियावरुन सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांना भाजपने नोटीस दिल्या होत्या. शिवसेनेने भाजपच्या या धोरणावर सडकून टीका केली आहे. “सरविरोधकांची यथेच्छ बदनामी, टवाळी आणि अपप्रचार करण्यासाठी भाजपने सोशल मीडियाचा वापर केला, पण त्याच सोशल मीडियातून भाजपच्या खोटेपणाचा पर्दाफाश सुरू होताच लगेच सोशल मीडियातील ‘सत्य’ मांडणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळण्याचे प्रकार सुरू आहेत.” असे सामनामध्ये म्हटले आहे.

‘सोशल मीडिया’चा भ्रष्ट गैरवापर आधी भाजपने सुरू केला. पण हा भस्मासुर आता त्यांच्यावर उलटताच ‘सोशल मीडिया’वर विश्वास ठेवू नका असे सांगण्याची वेळ भाजप अध्यक्ष अमित शहांवर आली आहे, असेही सामनामध्ये म्हटले आहे. अशाप्रकारे तरुणांना धमक्या देणे व कारवाया करणे हा योग्य मार्ग नसून सत्य स्वीकारुन आत्मचिंतन करणे हा उपाय आहे असा सल्लादेखील शिवसेनेने भाजपला दिला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्या तरुणांनो, ‘व्यक्त होताना विचार करा व एक पाय तुरुंगात ठेवूनच सोशल मीडियावर ‘बोलत’ राहा! अशा शब्दात सेनेने तरुणांना व्यक्त होत राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

COMMENTS