परभणीत महापौरपदी काँग्रेसच्या मीना सुरेश वरपूडकर यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अलिया अंजुम मोहम्मद गौस यांचा पराभव केला. वरपूडकर यांना 40 तर आलिया यांना 18 मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला साथ दिली. भाजपच्या 8 नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवार वरपुडकर यांना मतदान केलं. शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहिले. मीना वरपुडकर या माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी आहेत. नुकत्याच झालेल्या परभणी महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर 18 जागांसह राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्यात असलेल्या टोकाच्या मतभेदामुळे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाहीत.
COMMENTS