पायलटच्या चुकीमुळेच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात – चौकशी अहवाल

पायलटच्या चुकीमुळेच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात – चौकशी अहवाल

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूर जिल्ह्यातल्या निलंगामध्ये अपघात झाला होता. या प्रकरणी नेमलेल्या चौकशीमध्ये हेलिकॉप्टरचा पायलट दोषी आढळला आहे. क्षमेतेपेक्षा जास्त वजन असतानाही पायलटने हेलिकॉप्टरचे टेकऑफ घेतले. त्यामुळेच अपघात झाल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. विमान अपघात तपास पथकाने (एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) आपल्या अहवालात अपघाताचं हे कारण सांगितलं आहे. 25 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस लातूर जिल्ह्यातील निलंगामध्ये जलयुक्त शिवाराची कामे पाहण्यासाठी गेले होते. कामे पाहून निलंग्यातून निघताना हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. उड्डाण करतात हेलिकॉप्टर खाली कोसळले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते. घटनेची गंभीर दखल घेऊन, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या कक्षेतील एएआयबीकडे या अपघाताचा तपास सोपण्यात आला होता.  ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा लातूरमधील पारा चाळिशीपार होता. अशावेळी, हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळे येतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा थोडं कमी वजन घेऊनच उड्डाण करणं अपेक्षित असतं. परंतु, पायलटनं वजनाचा अंदाजच घेतला नाही. भार जास्त झाल्यानं उड्डाणच व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि हेलिकॉप्टर काही फुटांवरूनच खाली आलं, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

COMMENTS