पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीएमएलला गेल्या दहा वर्षात विविध कारणांसाठी 467 कोटी 79 लाख आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 49 कोटी 44 लाख असे एकूण तब्बल 517 कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जात नाही. येथील समस्या जाणून घेण्यासाठी पीएमपीएमएलचा एकही सक्षम अधिकारी पिंपरी-चिंचवडकडे फिरकत नाही. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आम्ही सत्ताधारी झालेलो नाही. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांनी शहरात येऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जनतेला येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्यात, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे.
यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन महापालिकांकडून पीएमपीएमएलला निधी दिला जातो. पुणे महापालिका 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के निधी देते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या दहा वर्षात पीएमपीएमएलला तब्बल 517 कोटींहून अधिक निधी दिला आहे. निधी घेत असाल, तर पिंपरी-चिंचवडला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवावी, अशी शहरातील जनतेने मागणी करणे चुकीचे ठरत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी संचलन तुटीपोटी कोट्यवधी रुपयांचा निधी देते. शहरातील प्रमुख रस्त्यावरूनच बस धावत असताना पिंपरी-चिंचवड महापालिका संचलन तूट सोसत आहे.
गेल्या 10 वर्षात पीएमपीएमएलला पिंपरी-चिंचवडच्या अंतर्गत भागात सक्षम बस व्यवस्था पुरविता आलेली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक परिसर आहे. तेथे रोज हजारो कामगार ये-जा करत असतात. मात्र त्यांच्यासाठी बस व्यवस्था नाही. कंपनी किंवा खासगी बसने अन्यथा स्वतःच्या वाहनानेच कामगारांना कामाच्या ठिकाणी जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन औद्योगिक परिसरात या आधीच बस व्यवस्था पुरविली गेली असती, तर पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढले असते आणि कामगारांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले नसते. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढला आहे. शहराच्या आसपास अनेक गावे आहेत. त्या गावांना शहराशी जोडण्याचे पाऊल पीएमपीएमएलने आजपर्यंत उचलले नाही. शहराच्या अंतर्गत भागात बस सुरू केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्याच वाहनांचा वापर करावा लागतो. असे असताना पीएमपीएमएलचा एकही अधिकारी पिंपरी-चिंचवडच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नाही. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची ही फसवणूक आहे. आम्ही सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करू इच्छित नाही.
महापालिकेची स्थायी समितीपुढे येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करूनच मंजुरी दिली जाते. समितीपुढे पीएमपीएमएलचा विषय असल्यास त्यावरही चर्चा होणारच. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समितीच्या सभेला उपस्थित राहणे बंधनकारकच असले पाहिजे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्याही समस्या जाणून घ्याव्यात. पीएमपीएमएलचे तत्कालिन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी देखील त्यावेळी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे मुंढे यांनी देखील पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था जाणून घ्यावी.
तुकाराम मुंढे यांनी शहरात अंतर्गत बसव्यवस्था, पुणे दर्शन बससेवेप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा, खास विद्यार्थ्यांसाठी, खास महिलांसाठी, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या गावांसाठी, पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक भागातून देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रासाठी विशेष बससेवा सुरू करावी, पुणे शहरात कार्यरत असलेली पुष्पक ही स्वतंत्र सेवा पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएमएलचे मुख्यालय क्रमांक 2 अंतर्गत सुरू करावी, पिंपरी-चिंचवडमधील बससेवा सुधारण्यासाठी जनमत चाचणी घ्यावी, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबवावेत, पीएमपीएमएलकडील 40 टक्के बसेस पिंपरी-चिंचवड परिसरात ऑपरेशनसाठी द्यावेत, अशी मागणीही सावळे यांनी केली आहे.”
COMMENTS