पुणे: भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे: भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी

वाहतूक पोलिसांना दमदाटीचे प्रकरण भोवले

 

वाहतूक पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटकेत असलेले भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून 25 एप्रिल पर्यंत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

 

आज कोर्टात युक्तीवाद करत असताना अमोल बालवडकर यांच्या वकिलांनी बालवडकर हे नगरसेवक आहेत, जबाबदार नागरिक आहेत, असे सांगत त्यांना जामीन देण्याची मागणी केली होती. यावर न्यायाधिशांनी चिडून कायदा सर्वांना सारखाच असतो, असे सांगत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि येरवडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांची रवानगी आज (12 एप्रिल)  येरवडा कारागृहात करण्यात आली.

 

नो-पार्किंगमध्ये चारचाकी उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी अमोल बालवडकर यांच्या गाडीवर जॅमर लावून कारवाई केली होती. हा प्रकार सोमवार (10 एप्रिल) रोजी घडला होता. आपल्या गाडीवर कारवाई केल्याचा राग आल्याने बालवडकर यांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी केली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी फिर्याद दिली होती.

COMMENTS