पुण्याच्या महापौरपदी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या पणती सून व भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांची आज (बुधवारी) निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीच्या नंदा लोणकर यांचा 46 मतांनी पराभव केला.
महापौरपदासाठी भाजकडून मुक्ता टिळक, शिवसेनेकडून संगीता ठोसर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी माघार घेतली. त्यामुळे दोन अर्ज राहिले. आघाडीच्या नंदा लोणकर आणि भाजपच्या मुक्ता टिळक यांच्यामध्ये लढत झाली. मुक्ता टिळक यांना 98 मते मिळाली. तर, नंदा लोणकर यांना 52 मते मिळाली. टिळक यांनी लोणकर यांचा 46 मतांनी पराभव केला.
शिवसेनेने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. शिवसेना तटस्थ राहिली. तर, मनसेच्या नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. स्वाक्षरी करुन मनसेचे दोन्ही नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी आघाडीच्या उमेदवार लोणकर यांना मतदान केले. दरम्यान, भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक फेटे परिधान करुन सभागृहात बसले होते. टिळक यांची महापौरपदी निवड होताच, सगळ्यांनी एकच जल्लोष केला. मोदी मोदीचा गजर सभागृहात करण्यात आला.
मुक्ता टिळक यांची राजकीय कारकिर्द
त्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2002 मध्ये सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडल्या गेल्या. त्यानंतर 2007, 2012 आणि 2017 असे सलग 4 वेळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पुणे मनपाच्या वृक्ष संवर्धन समिती, शहर सुधारणा, प्रभाग समिती अध्यक्ष, स्थायी समितीच्या सदस्या, पुणे मनपाच्या बायो डायव्हर्सिटी समितीच्या सदस्या आदी पदांवर व समित्यांवर त्यांनी कामे केले आहे.
COMMENTS