मुंबई- मनसेचे 6 नगरसेवक शिवसेना पक्षात आले आहेत, पण ही फोडाफोडी नाही, ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. उलट त्यांची घरवापसी झाली आहे. पूर्वीच आमची फोडाफाडी करून तो पक्ष बनला होता. त्यामुळे आजची घडामोड ही कोणाला दणका देण्यासाठी नाही तर शिवसेनेला मजबूत करण्यासाठी केली आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही कोणाला दणका देण्यासाठी हे काम केले नाही. आमचा पक्ष व मुंबई महापालिकेतील सत्तेचा कुंटा अधिक बळकट करण्यासाठी पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना आम्ही आनंदाने पक्षात घेतले आहे. ही फोडाफोडी नाही, ते लोक स्वगृही आले आहेत. त्यांनी गोवा, मणिपूर राज्ये इतर पक्षातील आमदार फोडून ताब्यात घेतली तर ती मुत्सदेगिरी आणि आम्ही छोटे काही केले तर लगेच गद्दारी कशी ठरते. पूर्वीचे शिवसैनिक पक्षात परत आले असतील तर भाजपच्या पोटात दुखायचे एवढे कारण काय? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी केला.
भांडूपमधील पराभवाबाबत पत्रकारांनी छेडले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मूळात हा विजय भाजपचा नाही. काँग्रेसच्या एका महिला नगरसेविकेचा मृत्यू झाल्यानंतर भाजपने त्यांच्या मुलीला फोडून त्यांच्याकडून उमेदवारी दिली. साहजिकच ज्या व्यक्तीचे निधन झाले त्याला सहानुभूती मिळते. त्यामुळे कालचा विजय हा भाजपचा नसून सहानूभूतीचा आहे, असे सांगत भाजपच्या नेत्यांची खिल्ली उडविली. आजच्या घटनेने भाजपला शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आला असेल असा टोलाही त्यांनी हाणला. अशोक चव्हाण व काँग्रेसचे मनापासून स्वागत करतो. भाजपच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असू शकतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
COMMENTS