विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांचा गोंधळ पहायला मिळत आहे. बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी प्रत्युत्तर देताना केला. तर कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची तरतूद हवी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभेत कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा विरोधकांचा गोंधळ पहायला मिळाला.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. कर्जमाफी करण्यासाठी 30 हजार 500 कोटी रूपयांची आवश्यकता आहे. कर्जमाफी केल्यास विकासासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत. कर्जमाफीनंतर पाच वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे कर्जमाफी करुन आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधक देणार का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच आम्हाला कर्जमाफी ही बॅंकांची नाही तर शेतकऱ्यांची करायची आहे. विरोधकांना कर्जमाफीवरून केवळ राजकारण करायचे आहे. याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
COMMENTS