भाजपमधील सर्वशक्तीमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल केल्यामुळे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले देशभर चर्चेत आले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावरुन नाना पटोले यांनी मोदींवर आणि राज्यातल्या फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावेळेपासून ते भाजपपासून बेदखल झाले असल्यासारखी स्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्याशिवाय कोणत्याही भाजप नेत्याने ना पटोलेंची भेट घेतली ना त्यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली. भाजपमधील कोणीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट असल्याचं समजतंय.
थेट मोदींना अंगावर घेतल्यामुळे आणि केंद्र आणि राज्यातल्या सरकारवर तोफ डागत शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे विरोधकांना गुदगुल्या झाल्या नाहीत तरच नवल ! स्वपक्षातून बेदखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं आणि राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर जाळ फेकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पटोले हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच त्यामुळे एक जनमत असलेला विदर्भातील ओबीसी चेहरा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सरू केले आहेत. तर शेतक-यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आणि राजू शेट्टींना पटोलेंची सोबत हवी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनीही त्यांच्यावर जाळे फेकले आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांसोबत पटोलेंची बैठक असल्याचं बोललं जातंय. त्या बैठकीचं प्रयोजन काय आहे हेही समजेलं नाही. मात्र त्यांची नाराजीवर समजूत घालण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा आहे. त्याच्यात काही मार्ग निघाला नाही तर पटोले हे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
COMMENTS