मुंबई – महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले महेश सावंत यांनी आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मोठ्यासंख्येनं सावंत यांचे समर्थकही उपस्थित होते.
सावंत यांनी नुकत्याच झालेल्या महापलिका निवडणुकीत प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करीत पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान सरवणकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. त्यांना सुमारे 8300 मते मिळाली होती.आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांचा निसटता विजय झाला होता. निवडणुकीवेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी नाराज महेश सावंत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरवणकर यांच्याशी टोकाचे मतभेद असल्याने सावंत यांनी शेवटपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र प्रभादेवीतील स्थानिक नागरिकानी सावंत यांना पाठिंबा दर्शवत भरघोस मतदान केलं. समाधान सरवणकर यांचा अवघ्या 250 मतांनी विजय झाला होता. या विभागात भाजपलाही चांगलं मतदान झालय. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं दादर माहीम आपल्याच ताब्यात राहावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्टी दाखवत सावंत यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे पुन्हा खुले केल्याचं सांगितलं जातेय.
COMMENTS