बनावट जात प्रमाणपत्र आढळल्यास पदवी अन् नोकरी धोक्यात

बनावट जात प्रमाणपत्र आढळल्यास पदवी अन् नोकरी धोक्यात

नोकरी मिळवण्‍यासाठी किंवा शिक्षणासाठी बनावट जात प्रमाणपत्र दिल्‍यास संबंधित व्‍यक्‍तीला नोकरी आणि पदवी गमवावी लागेल, असा निकाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने आज दिला आहे. संबंधित व्‍यक्‍तीला दोषी ठरवून शिक्षाही दिली जाऊ शकते, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी गुरुवारी सर्वोच्‍च न्‍यायालयाने हा निकाल दिला आहे. जर एखादा व्‍यक्‍ती 20 वर्षांपासून नोकरी करत असेल आणि त्‍याचे जात प्रमाणपत्र बनावट असेल तर त्‍याला नोकरी सोडावी लागेल, तसेच त्‍याच्‍याविरोधात कारवाईदेखील करण्‍यात येईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बनावट जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्‍हटले होते. अशा प्रकारे नोकर्‍या मिळवणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी व्‍हावी, असे निर्देश न्‍यायालयाने सर्व सरकारी विभागांना दिले होते.

याप्रकरणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत आकडेवारी सादर केली होती. जवळपास  1, 832 जणांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकर्‍या मिळवल्‍या आहेत. यातील 276  जणांवर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्‍यात आली होती. 521 जण कारवाईचा सामना करत आहेत. तर 1,035जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्‍याचे जितेंद्र सिंह यांनी म्‍हटले होते.

COMMENTS