बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज  – अशोक चव्हाण

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज – अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकरांचे मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता असून, त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून चव्हाण म्हणाले की, लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे सुसंस्कृतपणाचा आव आणणा-या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.  कॅबिनेट मंत्री असलेल्या लोणीकरांनी राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करून विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा, अशा पध्दतीची हिंसक आणि चिथावणीखोर भाषा वापरली आहे. सरकारने या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार संविधानाने विरोधी पक्षांना दिलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला संविधानही मान्य नाही आणि लोकशाहीवरही विश्वास नाही. त्यांना हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळे सरकारवर टीका  करणाऱ्यांना मारहाण करा, तोडफोड करा, त्यांच्या सभा उधळून लावा, अशा पध्दतीच्या धमक्या ते देत आहेत. पण काँग्रेस पक्ष भाजप नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. यापुढेही काँग्रेस पक्ष सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा लोकशाही पध्दतीने विरोध करत राहील. या अगोदरही भाजपा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत आणि विरोधी पक्षाबाबत अशीच बेताल वक्तव्ये केली आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते अशा भाषेचा वापर करीत आहेत. त्यांची ही सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.

 

 

 

 

COMMENTS