बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

बारपासून 500 मीटरपर्यंत रस्ता बांधता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

महामार्गापासून 500 मीटर अंतरावर न्यायालयाने दारूविक्रीस बंदी घातली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय अपघातग्रस्त नातेवाईक संघटनेने प्रतियाचिका सादर केली व लांब लांबून येणारे मद्यपी वाहने वाकडी वाट करून 500 मीटर आत गाडी नेतील आणि दारू पितिलच व अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही अशी भीती व्यक्त केली. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सुधारीत निकाल दिला असून, महामार्गापासून 500 मीटर लांब मद्यविक्रीस परवानगी देताना, या जागेच्या चारही बाजुंना कुठल्याही प्रकारचा रस्ता असू नये अशी अट टाकली आहे.

ज्या जागेपर्यंत जाण्यासाठी 500 मीटर अंतर चालतच जावे लागेल अशा ठिकाणीच बार उघडता येईल अशी अट न्यायालयाने घातली आहे. यामुळे बहुतांश मद्यपींची इच्छा मरेल आणि त्यातही जे जातील ते परत चालत येताना शुद्धीवर येतील असा यामागचा आडाखा आहे. त्यातही ज्या जागा उंचसखल आहेत, आजुबाजुला प्रचंड खड्डे आहेत, डंपिंग ग्राउंड आदी आहे अशा ठिकाणी बार उघडण्यास अग्रक्रमाने परवानगी द्यावी असा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे.

सरतेशेवटी एकदा अशा जागी बारला परवानगी दिली की त्यानंतर बारचे अस्तित्व असेपर्यंत त्याच्या चारही बाजुंना 500 मीटर अंतरापर्यंत रस्ता बांधता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल माननीय न्यायालयाने दिला आहे.

COMMENTS