बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार – नवाब मलिक

बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार – नवाब मलिक

इकबाल कासकरला खंडणी प्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इकबाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिले होते.  असे तथ्यहीन वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. ज्या वृत्तवाहिन्या आपली चूक लक्षात घेऊन माफी मागणार नाहीत त्यांच्याविरोधात खटला दाखल करु, असे सुतोवाचही नवाब मलिक यांनी केले.

 

याबाबत माहिती देताना मलिक म्हणाले की, इकबालच्या अटकेनंतर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अटकेचा सर्व तपशील दिला होता. त्यामध्ये त्यांने कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्या पक्षातील नेत्यांची नावे घेतलेली नव्हती. तरिही काही वाहिन्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन बेजबाबदार पणे बातमी चालवली.  तब्बल ४० वाहिन्यांचे विडियो राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवले आहेत. ज्या वाहिन्यांनी जाणूनबुजून बातमी चालवली, त्यांना नोटीस पाठवण्यातयेईल. वाहिन्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तयारी पक्षातर्फे केली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.

COMMENTS