मेसर्स धनलक्ष्मी एन्टरप्रायजेस कंपनीचे नोंदणीकृत भागीदार नसतानाही एका कॉण्ट्रॅक्टरची साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अकोलाचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या चौघांमध्ये भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप याचाही समावेश आहे.
विक्रोळी पूर्व येथे असलेल्या बिल्डींग क्र.87चा पुनर्विकास करण्यासाठी सचिन काळे यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसचे भागीदार सुरेश मोरे यांच्याशी करार केला होता. सचिन काळे हे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार असून, त्यांनी मोरे यांच्यासोबत ५ ऑक्टोबर २०११ रोजी करार केला होता. पहिल्या दोन मजल्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काळे यांनी धनलक्ष्मी एण्टरप्रायजेसकडे देयक सादर केले. त्यानुसार बळवंत महल्ले व रणधीर सावरकर यांनी धनलक्ष्मी एन्टरप्रायजेसच्या नावाचा ४५ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा धनादेश काळे यांना दिला. हा व्यवहार ६ मार्च २०१२ रोजी झाला. त्यानंतर काम पूर्ण होईल तसे काळे यांनी टप्प्या टप्याने देयके सादर केली. मात्र, त्याबदल्यात त्यांना अर्धवट रकमेचा धनादेश देण्यात आला. पूनर्विकास प्रकल्पाचे काम काही अपवाद वगळता पूर्ण झाल्यावर काळे यांनी बांधकामाची थकीत रक्कम म्हणजेच ६ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. यावेळी प्रकल्पाचे ८६.३० टक्के बांधकाम पूर्ण झाले होते. या वेळी थकीत रक्कम देण्याऐवजी बळवंत महल्ले आणि रणधीर सावरकर यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप सचिन काळे यांनी तक्रारीत केला आहे.
दरम्यान, आमच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही आमचे म्हणने न्यायालयात मांडू, असे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे.
COMMENTS