पुणे – भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. कर्जमाफी झाली पाहिजे, किमान आधारभूत किमतीवर शेतमालाची खरेदी व्हावी अशी आमची मागणी आहे, परंतु असे काहीच होताना दिसत नसून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याचे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून निघालेली संघर्ष यात्रा (मंगळवारी) सकाळी पुण्यात पोहीचली. त्यानंतर मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, अशोक चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत.
तटकरे म्हणाले की, सध्याचे सरकार जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाही. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला असता सरकारने 19 आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर आम्ही चांदा ते बांदा या मार्गावर संघर्ष यात्रा काढण्याचे ठरवले. या यात्रेतील पहिल्या टप्प्याचा समारोप पनवेल येथे होणार आहे. ही संघर्ष यात्रा आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. कर्ज माफी झाल्याशिवाय थांबणार नाही, शेतमालाला आधारभूत किंमत मिळल्याशिवाय थांबणार नसल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी संघर्ष यात्रा असताना विरोधक मात्र एसी बसमधून गारेगार हवा खात चंद्रपूरात पोहोचल्याने यात्रा सुरू होण्यापूर्वीच टीका झाली होती. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करू शकते, पण घाम गाळणा-या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास नकार देणा-या सरकार विरोधात ही संघर्ष यात्रा असल्याचे ते म्हणाले.
जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही, तोपर्यंत ही संघर्ष यात्रा चालूच राहणार असून शेतकऱ्यांच्या मुद्यावर सर्वांची एकजूट आहे. त्यामुळे सर्व विरोधक सरकारविरोधात एकवटले आहे. मात्र, भाजप सरकार विरोधकांमध्ये फूट पडून ही संघर्ष यात्रा संपण्याच्या षडयंत्र रचत आहे. समृद्धी महामार्गासाठी, बुलेट ट्रेनसाठी पैसे देण्यास सरकार तयार आहे. पण शेतकऱ्यांची निर्णय घेण्यावर वेळ काढू पणा करत असल्याचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी दाखवली आहे. संघर्ष यात्रेचा दबाव आल्याने सरकारने पीक विम्याच्या रकमेतून कर्ज कापून घेण्याला स्थगिती दिली असल्याचे सांगत 19 आमदारांचे निलंबन म्हणजे विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे. मात्र, आम्ही या दबावाला बळी न पडता ही यात्रा आणखी तीव्र करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
COMMENTS