नागपूर – केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यास वेगळा विदर्भ करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. सत्तेत येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने “नितीन गडकरी मुर्दाबाद, भाजप सरकार चले जाव’ अशा घोषणा देत शेकडो विदर्भवाद्यांनी नागपुरात बुधवारी आंदोलन केले. गडकरी यांच्या वाड्यावर हा मोर्चा पोहोचण्यापूर्वीच महाल चितारओळीतील गांधी पुतळ्याजवळ पोलिसांनी अडवला.
माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गडकरींच्या वाड्यावर जाणार होता. या वेळी संतप्त झालेल्या विदर्भवाद्यांनी नितीन गडकरी मुर्दाबाद, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत भाजप सरकारचा निषेध केला. या वेळी पोलिसांनी विदर्भवादी नेत्यांना अडवल्यानंतर नितीन गडकरींच्या वाड्यापर्यंत जाऊ देणार नाही, तोपर्यंत हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
COMMENTS