ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला असल्याचं अनेक वेळा विरोधी पक्षाकडून टीका होत असताना दुसरीकडे मात्र, काँग्रेस नेत्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
ईव्हीएमच्या वादात विरोधी पक्षांची पराभवाची मानसिकता दिसून येते. भारतातील ईव्हीएम मशिन या जगातील सर्वोत्तम मशिन असल्याचे सांगत काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली असतानाच काँग्रेसचेच नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी ईव्हीएमवरुन पक्षाविरोधात भूमिका मांडली आहे.
मोईली म्हणाले, मी कायदा मंत्री असताना ईव्हीएमच्या वापराला सुरुवात झाली. त्यावेळीही तक्रारी आल्या होत्या. पण आम्ही त्यात सुधारणा केल्या असे त्यांनी सांगितले. तुम्ही इतिहास विसरु नये. ईव्हीएमविरोधात वातावरण तापले आहे म्हणून आपणही त्यात सहभागी होणे योग्य नाही असे सांगत त्यांनी पक्षावरच टीकास्त्र सोडले.
ईव्हीएमविषयी आम्हाला पूर्ण माहिती आहे. यूपीएच्या काळाताही ईव्हीएमची तपासणी झाली होती. तुमच्या पराभवासाठी ईव्हीएम हे कारण ठरु शकत नाही असे त्यांनी सुनावले. पराभवाची मानसिकता असलेली मंडळीच ईव्हीएमकडे बोट दाखवतील असेही ते म्हणालेत. ईव्हीएमसंदर्भात आपण एक समिती नेमू शकतो. पण पुन्हा मतपत्रिकांचा वापर करणे योग्य नाही असे मोईली यांनी म्हटले आहे. ईव्हीएमविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरु केल्यास काँग्रेस त्यात सहभागी होणार का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर मोईली म्हणाले, काँग्रेसने यात सहभागी होऊ नये. आमच्याशी याविषयी कोणीही चर्चा केलेली नाही असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ईव्हीएमविरोधा काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये ईव्हीएम यंत्रातील कोणतेही बटण दाबल्यास मत भाजपलाच जात होते. मशिनमधील सॉफ्टवेअरमध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आम आदमी पक्षाने याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
COMMENTS