भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच एका खाजगी गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड ठाण्यातून भिवंडीत नेली जात होती.
महापालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असताना मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि निवडणूक आचारसंहिता पथकांनी देखरेख अधिक कडक केली आहे. त्यातच साईबाबा नका चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरु असताना एमएच 04 ईटी 1508 क्रमांकाच्या एका पांढऱ्या तवेरा गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. ही रोकड महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची असल्याचा दावा करण्यात आला. मात्र गाडीत असलेल्या इसामांपैकी कुणाकडेही याबाबतची पुरेशी कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे या सर्वांना शांतीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून रोकडही जप्त करण्यात आली आहे. ही रोकड नेमकी कुणाची आहे आणि कशासाठी आणली जात होती, याचा तपास पोलीस करत आहे.
COMMENTS