मुंबई – कर्नाटक राज्यातील दक्षिणा कन्नडा जिल्ह्यातील ऐतिहासिक मंगलुरु शहरातील कसबा बेंगरे गावाजवळील समुद्रातील बेटावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महान असल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे कर्नाटकमध्ये अनावरण करताना आनंद होत असल्याची भावना श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. कर्नाटकमधील बेटावर उभारलेल्या या पुतळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला कन्नड बांधवांकडून मानाचा मुजरा मिळाल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. यावेळी संतोष कुमार शेट्टी हे अध्यक्षस्थानी होते तर मच्छिमार महाजन सभेचे अध्यक्ष मोहन बेंगरे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. डॉ. कलाडका प्रभाकर भट हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुमारे बारा फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. सिंहानावर आरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचे रुप भव्य दिव्य स्वरुपात दिसते. गावातील मच्छिमार बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडला. भगवे उपरणे घालून मोठ्या प्रमाणावर नागरिक या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थित होते. बेटावर भगव्या रंगाची उधळण झाल्याचे दृष्य यावेळी दिसत होते.
राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची माहिती देऊन छत्रपती शिवाजी महाराज व कर्नाटक यांच्यातील नात्यांना उजाळा दिला.
COMMENTS