सध्याच्या वातावरणात कुणीही फुटीरतावाद्यांशी साधी चर्चा करायचा विषय काढला तरी त्याला देशद्रोही ठरवले जाते. हाच न्याय लावायचा झाला तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही देशद्रोही म्हणायचं का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांकडून करण्यात आलेला हिंसाचार आणि पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल त्यांनी भाष्य केले.
या पार्श्वभूमीवर बोलताना सिन्हा यांनी म्हटले की, आतापर्यंत हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही आपला जीव धोक्यात टाकून मतदान करायचे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर फुटीरवाद्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. तसेच त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या प्रत्येकावर देशद्रोहीपणाचा शिक्का मारण्याची सवय सोडून द्यावी, असे सिन्हा यांनी म्हटले. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. भाजप आणि पीडीपीने आश्वासन दिल्याप्रमाणे काश्मीरमधील सर्व घटकांना चर्चेत सामावून घेतले पाहिजे, असेही सिन्हा यांनी सांगितले. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या 70 वर्षांपासून सुधारु शकलेले नाहीत. विश्वासाच्या अभावामुळे हे सगळे घडत आहे. जोपर्यंत पाकिस्तान प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या पवित्र्यात आहे तोपर्यंत कोणत्याही चर्चेला अर्थ नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले.
COMMENTS