शिवसेना सत्तेत आल्यापासून सत्तेत राहून भाजप सरकारवर टीका करत आहे. जिथे जिथे जनतेच्या हिताच्या विरोधात निर्णय असेल तिथे शिवसेना सरकारला विरोध करेल असं सांगत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वेळोवेळी सरकारच्या विरोधात बोलत असतात. काहीवेळेला शिवसेनेची ही भूमिका मतदारांना पटू शकते. मात्र सत्तेत राहायंचं, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीही बोलायचं नाही ( किंवा भाजप बोलू देत नसेल ) आणि बाहेर येऊन सरकारच्या विरोधात वारंवार बोलायचं, हे काही पटण्यासारखं नक्कीच नाही. गेल्या दोन महिन्यांपासून दोन मोठ्या प्रश्नावर शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे शिवसेनेची विश्वासहार्यतच पणाला लागली आहे असे म्हणावे लागेल.
समृद्धी महामार्गाच्या प्रश्नावरु तर शिवसेनेनं सपशेल पलटी मारली आहे. ते कितीही दावा करत असले तरी जनतेला त्यांचा हा मुद्दा पटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांच्या भाषणातून समृद्धी महामार्गाला जोरदार विरोध केला आहे. विनाशकारी विकास आम्हाला नको आहे अस ते कालपरवापर्य़ंत सांगत होते. मात्र त्यांचेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात समृद्धीसाठीच्या जमीन अधिग्रहणाची कार्यक्रमाला हजेरी लावतात एवढच नाही तर साक्षीदार म्हणून त्याच्यावर सही करतात. हे आश्चर्यकारक आहे. शिवसेनेच्या दुटप्पीपणाच्या बातम्या या माध्यमातून आल्यानंतर पक्षप्रमुखांना एकनाथ शिंदे यांना बोलावून एकत्र पत्रकार परिषद घ्यावी लागली. यातच सर्वकाही आले.
कर्जमाफीच्या प्रश्नावरुनही शिवसेनेची अशीच फरफट झाली. सरसकट कर्जमाफीची मागणी पक्षाने केली होती. सरकारने ती मागणी मान्य केली नाही. तरीही शिवेसनेला ती आता मान्य करावीच लागली. दसुरं असं की कर्जमाफीचा निर्णय घेताना आणि त्यानंतर झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयाच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत. पुन्हा उद्धव ठाकरे बाहेर सरकारच्या निर्णयावर टीका करतात हे शिवसैनिकांनाही पटण्यासारखं नाही. पक्षाची तीच गत राष्ट्रपतीपदाच्या निर्णयाच्या बाबतीत झाली. एनडीएने उमेदवार जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. मतांच्या राजकाऱणासाठी भाजपनं हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली. आणि दुस-याच दिवशी त्याच उमेदवाराला पाठिंबा दिला. यावरुन विरोधक उद्धव ठाकरे म्हणज्ये यू टी म्हणज्येच यू टर्न अशी टीका करु लागले आहेत. शिवसेनेनं सातत्याने अशी भूमिका घेतली तर त्यातून मग शिवसेनेची समृद्धी होईल का ? असा प्रश्न आहे.
COMMENTS