गेल्या काही दिवसांपासून मतदान यंत्राबाबत मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झालाय. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीमचा वापर न करता पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी केलीय. त्यामुळे दुखावलेल्या निवडणुक आयोगाने आता ईव्हीएमवर संशय घेणा-यांना खुलं आव्हान द्यायचं ठरवलंय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे आव्हान दिलं जाणार आहे. ज्यांना या ईव्हीएमबाबत संशय आहे त्यांनी याच्यातल्या तज्ञांनी समोर येऊन या मतदान यंत्रांमध्ये फेरफार करुन दाखवावा असं आव्हानचं आयोग देणार आहे. एएनआय या वृतसंस्थेनं ही बातमी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करुन ईव्हीएममध्ये फेरफार करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप मायावती यांनी सर्वप्रथम केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनीही त्यांचीच री ओढली.
अरविंद केजरीवाल यांनी देखील पंजाबमधील पराभवाचे खापर ईव्हीएमवरच फोडले होते. मतदान यंत्रामध्ये कुठलाही बदल करता येणे अशक्य आहे असे त्यावेळी निवडणूक आयोगाने केजरीवालांना म्हटले होते. तुमच्या पराभवाची कारणे तुम्ही शोधा आमच्यावर दोषारोप करू नका असे त्यांनी म्हटले होते. माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी देखील ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार करता येत नाही असे म्हटले होते. भिंडमध्ये मतदानापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये कुठलेही बटन दाबले असता दोन वेळा भाजपची, एक वेळा काँग्रेसची आणि एक वेळा इतर पक्षाची पावती आली होती. त्यामुळे देखील गदारोळ निर्माण झाला होता. हे मशीन सेट करण्यात आले नव्हते. आता ते सेट झाले आहे असे देखील निवडणूक निर्णय अधिकारी सलोनी सिंह यांनी म्हटले होते. या प्रकाराची गंभीर दखल आयोगाने घेतली होती. यामध्ये काही गैरप्रकार झाला नव्हता असे आयोगाने स्पष्ट केले होते.
COMMENTS