दिल्ली – मतदानयंत्राच्या विश्वासहार्यतेबाबत सध्या अनेकांनी शंका घेतल्या आहेत. मतदानयंत्रात फेरफार होतात असाही आरोप होतोय. मात्र यापुढे तुम्हाला असा आरोप करता येणार नाही. कारण तुम्ही कोणाला मतदान केलं याची पावतीच तुम्हाला मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून याची अंमलजबावणी होणार आहे. त्यासाठी लागणा-या नवीन यंत्राची खरेदी लवकरच निवडणूक आयोग करणार आहे. निवडणूक आयोगाने ईसीआयएल आणि बीईएलला या दोन कंपन्यांना ही नवीन यंत्रे खरेदी करण्याबाबत पत्र पाठवले आहे. ही यंत्रे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांत खरेदी केली जाणार आहेत, असे पत्राद्वारे सांगितले आहे. या नव्या यंत्राचा वापर केल्याने मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडण्यास मदत होईल. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे मतदारांचा निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढेल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केला. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारने ३, ७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
COMMENTS