तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर के नगर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तब्बल 82 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण झाला आहे. मतदान केंद्रात फक्त चार मतदान यंत्र लावता येतात आणि यातील उमेदवारांची मर्यादा 63 असते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचे असा प्रश्न आता राज्य निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.
चेन्नईत 12 एप्रिल रोजी आरके नगर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शशिकला गटाकडून येथे टी.टी.व्ही. दिनाकरन हे उमेदवार आहेत. तर पन्नीरसेल्वम गटाकडून ई. मधुसूदनन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने प्रसिद्ध संगीतकार गंगई आमरन यांना रिंगणात उतरवले आहे. तर डीएमकेने एन.मुर्तूगणेश यांना उमेदवारी दिली आहे. हे मुख्य स्पर्धक असले तरी उमेदवारांची यादी इथेच संपत नाही. निवडणूक आयोगाकडे तब्बल 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या विक्रमी संख्येने निवडणूक आयोगाचे पंचाईत झाली आहे.
मतदान केंद्रात जास्तीत जास्त चार मतदान यंत्र लावता येतात. ईव्हीएमवर 15 बटणं असतात आणि यातील एक बटण हे नोटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते. यानुसार चार मशिन्सवर उमेदवारांची मर्यादा 63 आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचे असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दुपारनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. पण उमेदवारांची संख्या 63 पेक्षा जास्त झाल्यास आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करु असे तामिळनाडूमधील राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.
दरम्यान, मतदान यंत्रांमधील उमेदवारांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रलंबित आहे. नवीन मतदान यंत्रांना तांत्रिक भाषेत एम 3 ईव्हीएम असे म्हटले जाते. या मशिनमध्ये तब्बल 126 उमेदवारांचा समावेश शक्य आहे. या नवीन मशिन्सचा वापर 2019 मधील निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
COMMENTS