नवी दिल्ली – मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. याला आता निवडणूक आयोगानेही चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. मतदान यंत्रासंदर्भात आरोपांना आयोगाने खुले आव्हान देण्याचा निर्णय घेतला. लवकरच याची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सुत्रांनी दिली आहे.
यंत्रात कसे फेरफार करता येतात हे सिद्ध करा असे आव्हानच आयोगाने दिले. यासाठी लवकरच एक तारिख ठरवली जाईल. यापूर्वी 2009 मध्येदेखील निवडणूक आयोगाने अशा स्वरुपाचे खुले आव्हान दिले होते. त्यावेळीही ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे आरोप झाले होते. पण,ओपन चॅलेंजमध्ये एकालाही हे आरोप सिद्ध करता आले नव्हते.
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरु आहेत. या मतदान यंत्रात कोणतेही बटण दाबले की मत भाजपलाच जाते असा आरोप आम आदमी पक्ष, बसपाने केला आहे. तर काँग्रेसनेही यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अतेर व उमरिया जिल्ह्यातील बांधवगड या विधानसभा मतदारसंघांत येत्या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मतदान यंत्राची चाचणी शुक्रवारी अतेर येथे घेण्यात आली होती. या चाचणीत, संबंधित यंत्रावर दिलेल्या विविध पक्षांच्या पर्यायातील कुठलेही बटण दाबले तरी त्यातून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचीच पावती मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे या आरोपांना आणखी धार मिळाली आहे.
सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने आम्हाला ७२ तासांसाठी मतदान यंत्र द्यावे असे आव्हान दिले होते. ‘आम्ही या कालावधीत मतदान यंत्रात बदल करता येतात हे सिद्ध करुन दाखवू’ असे केजरीवाल यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्येही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप झाला होता.
COMMENTS