शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा… आदी मागण्या घेऊन पुण्याहून निघालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांची “आत्मक्लेश यात्रा’ काल सोमवारी मुंबईत दाखल झाली. कर्जमुक्ती करण्यासाठी राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे आणलेले अर्ज आज राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना दिले. यावेळी राज्यपाल यांनी राजू शेट्टी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
राजू शेट्टी यांच्या यात्रेला सकाळी परळ येथून सुरुवात झाली. राज्यभरातून आलेल्या 25 ते 30 हजार शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेमुळे लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूकींची कोंडी झाली होती. या यात्रेचे राणीच्या बागेजवळ असलेल्या मैदानात सभेत रुपांतर झाले. या सभेला मार्गदर्शन करताना राजू शेट्टी यांनी केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारवर टिकेची झोड उठवली. एका महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अन्यथा मुंबईसह मोठ्या शहरांचा भाजीपाला, दूध आदी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करू, असा अल्टिमेटम स्वाभीमानी शेतकरी संघटेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज गांधी मार्गाने आंदोलन केले आहे. मात्र, हेच आंदोलन एक महिन्यानंतर भगतसिंग यांच्या मार्गाने केले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.
एक महिन्यात कर्जमाफी झाली नाही तर कार्यकारीणीची बैठक घेणार असून या बैठकीत भाजपाबरोबर रहायचे की नाही हे ठरवणार. सदाभाऊ खोत यांना राजीनामा द्यायला सांगणार का असे विचारणा केली असता, संघटनेचा जो निर्णय घेईल तो प्रत्येकाला मान्य करावा लागेल असे राजू शेट्टी म्हणाले. पुण्याहून निघालेल्या आत्मक्लेश यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला.
COMMENTS