… मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, विखे पाटलांबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य !

… मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, विखे पाटलांबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य !

शिर्डी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे काल शिर्डीमध्ये एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कौतुकाचा एवढा वर्षाव केला की राजकीय संशय निर्माण व्हावा. साईबाबा शताब्दी महोत्सव वर्षास मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणावं असं साकडं विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं. निळवंडे धऱणाचं आजपर्य़ंत फक्त राजकारण झालं त्यामुळेच तो प्रश्न सुटला नाही. आपल्या कार्य़काळात हे काम पूर्ण करा असं सांगत विखे पाटील यांनी स्वकीयांना चिमटे काढले. मला मागच्या सरकारपेक्षा या सरकारमधले मंत्री जास्त जवळचे वाटतात आणि घरी आल्यासारखे वाटतात. आज माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीवर शिक्कामोर्तब झाला अशा शब्दात विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं गुणगाण गायलं. तर मुख्यमंत्र्यांनीही विखे पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं. विखे पाटील यांचे विरोधी पक्षात जास्त मित्र आहेत तर स्वपक्षात जास्त विरोध असल्याचा टोला हाणला. आमची मैत्री जाहीर केल्याने विखे पाटील यांना जास्त त्रास होईल पण  सुदृढ लोकशाहीत अशी मैत्री असणे गैर नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. निळवंडे धरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासनही त्यांनी दिलं. विखे पाटील विरोधी पक्षाच्या रोल मध्ये आणि मी माझ्या रोलमध्ये आहे. मात्र भविष्यात काय होते हे कोणाला माहिती आहे असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

COMMENTS