मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक ‘बाईक अॅम्ब्युलन्स’

मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक ‘बाईक अॅम्ब्युलन्स’

मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये रुग्णांना जलद गतीने सेवा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या मोटर बाईक अॅम्ब्युलन्स उपक्रमाचे उद्घाटन आज पार पडले. 

भल्या मोठ्या ट्रॅफिकच्या गर्दीत सायरन वाजत उभी असलेली अॅम्ब्युलन्सचे काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता मुंबईच्या रस्त्यांवर ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ पाहायला मिळणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकारने बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. प्रथोमपचारासाठी जे जे आवश्यक असेल, ते ते सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असणार आहे. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकपाठोपाठ ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करणारं महाराष्ट्र चौथे राज्य ठरले आहे.  सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर बाईक अॅम्ब्युलन्स सुरु कऱण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य शहरांतही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरु करण्यात येतील, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितले. या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या भागात या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ असतील.

सध्या 10 बुलेट बाईक या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून पुढील काळात त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात ही सेवा आजपासून उपलब्ध असेल. त्यासाठी आरोग्य सेवेचा प्रशिक्षित आणि मुंबईच्या कानकोपऱ्याची माहिती असलेला कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलाय. वाहतूक कोंडीत रुग्णाच्या अत्यावश्यक ‘गोल्डन हवर’मध्ये तसेच राज्याच्या दुर्गम भागात हा उपक्रम आरोग्य सेवा जलद गतीने  उपलब्ध करून देण्यात महत्वाचे योगदान देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव  ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

COMMENTS