मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राष्ट्रवादीने उरकले निळू फुले नाट्यगृहाचे उद्‌घाटन

मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राष्ट्रवादीने उरकले निळू फुले नाट्यगृहाचे उद्‌घाटन

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्‌गृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित न केल्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या आधीच नाट्यगृहाचे उद्‌घाटन उरकून टाकले.  सांगवी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

पिंपळेगुरव येथे पालिकेतर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह बांधले आहे. या नाट्यगृहाचे काम राष्ट्रवादीच्या काळात झाले होते. या नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शनिवारी) दुपारी तीन वाजता भोसरीतून ‘ई’ (ऑनलाइन) उद्‌घाटन होणार होते. मात्र, या उद्‌घाटनाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना निमंत्रित न केल्याने सत्ताधारी भाजपचा निषेध करत राष्ट्रवादीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते उद्‌घाटन केले.

यावेळी नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, श्याम जगताप, शोभा अदियाल, तानाजी जवळकर, शिवाजी कर्डिले, श्वेता इंगळे आदी उपस्थित होते. दरम्यान,  सांगवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, नाट्यगृहाचे काम न्यायालयीन कचाट्यात अडकले होते. मी स्वत: नगरसेवक असताना नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे पाठपुरावा करून काम पूर्ण केले आहे. नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते.  त्याचे कामही राष्ट्रवादीच्या काळात पूर्ण झाले आहे. भाजप राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असेही जगताप म्हणाले.

शहराच्या विकासाचे शिल्पकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाट्यगृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला बोलविणे गरजेचे होते. मात्र, संकुचित विचा-यांच्या लोकांनी त्यांना बोलाविले नाही अशी टीका त्यांनी केली.
 

COMMENTS