मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे – अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे – अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करण्यापेक्षा शेतक-यांचा सरकारवरचा विश्वास का उडाला? त्यांच्यावर संप करण्याची वेळ का आली?  याचे आत्मचिंतन करावे मुख्यमंत्र्यांनी बेछूट आरोप करून विरोधकांवर नाही तर शेतक-यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे, अशी घणाघाती टीका  काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातले शेतकरी संपावर गेल्यामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीसाठी शेतक-यांनी स्वयंस्फूर्तपणे सुरु केलेल्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. संपकरी शेतक-यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित असताना मुख्यमंत्री मात्र  “शेतक-यांच्या संपाच्या आड विरोधी पक्ष हिंसा करित आहेत” असे बेछूट आणि बेजबाबदार आरोप करित आहेत. मुख्यमंत्र्यांनी असे आरोप करून विरोधकांवर नाही तर शेतक-यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातला शेतकरी उध्दवस्त झाला आहे. त्या शेतक-याला जगवण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सरकारने राज्यातल्या सर्व शेतक-यांना कर्जमाफी दयावी अशी मागणी काँग्रेस पक्ष विधिमंडळात आणि रस्त्यावर उतरून साततत्याने करित आहे.मात्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शेती आणि शेतक-यांचे प्रश्नच कळतच नाहीत त्यामुळे  राज्यातल्या शेतक-यांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे.

विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला राज्यभरातील शेतक-यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून सरकारने शेतक-यांचा विश्वास गमावला आहे हे स्पष्ट झाले होते. संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे पायाखालची वाळू घसरल्यानेच भाजपने शिवार संवाद यात्रा काढण्याची घोषणा केली. या यात्रेत भाजप नेत्यांनी साले, चालते व्हा अशा शब्दात शेतक-यांशी संवाद साधला. त्यामुळे राज्यभरातील शेतक-यांमध्ये मोठा संताप होता. वारंवार मागण्या करूनही सरकार कर्जमाफीबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने शेवटी शेतक-यांवर संप करण्याची वेळ आली आहे. सरकारनेच शेतक-यांवर ही वेळ आणली असून शेतक-यांवर संपावर जाण्याची वेळ येणे दुर्देवी घटना आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

 

 

COMMENTS