मुंबई – मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल अनेक डेडलाईन देऊनही अजून लागलेले नाहीत. यावरुन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात निकालाची डेडलाईन दिली होती. ती पाळली गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणावा का ? असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणावरून आदित्य यांनी शिक्षणमंत्र्यांवरही जोरदार प्रहार केला. केवळ कुलगुरूंचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली. या लांबलेल्या निकालामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात मेंटल हरासमेंटची तक्रार दाखल करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. निकाल लावण्यासाठी काम दिलेली ऑनलाइन कंपनी कोणची होती, विद्यापीठासोबत MOU झाला होता का हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यात आम्हाला पारदर्शकता हवी आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
COMMENTS