‘मेरा घर, भाजपा का घर’ यामुळे नागरिक वैतागले

‘मेरा घर, भाजपा का घर’ यामुळे नागरिक वैतागले

भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजप ने नवीन ‘मिशन’ सुरू आहे. या  ‘मिशन ’मुळे मात्र नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण देखील तसच आहे…तुमची परवानगी न घेता कोणी तुमच्या घराच्या भिंती घोषणांनी रंगवून गेल्यास तुमची काय प्रतिक्रिया असेल? , तर तुम्ही विरोध कराल की सर्व काही शांतपणे पाहात बसाल? कोणालाही आपल्या घराच्या भिंती परवानगीशिवाय रंगवलेल्या आवडणार नाहीत. तर कोणालाही संताप येईल. भोपाळमध्ये अनेकांच्या मनात अशीच संतापाची आणि मनस्तापाची भावना आहे. कारण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही संमतीशिवाय लोकांच्या घराच्या भिंती रंगवल्या आहेत.

भोपाळमधील अनेक घरांच्या भिंती भाजप कार्यकर्त्यांनी रंगवल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्याने भीतीपोटी स्थानिकांनी कार्यकर्त्यांना अडवले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या भिंतीवर पक्षाच्या घोषणा लिहिल्या. भाजप कार्यकर्त्यांच्या या ‘मिशन’मुळे स्थानिक  मात्र  वैतागले  आहे. ‘माझं घर भाजपचं घर’ अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून घरांच्या भिंतीवर लिहिल्या जात आहेत. कोणत्याही परवानगीविना भाजपचे कार्यकर्ते घरांच्या भिंती रंगवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांची घरेदेखील सोडलेली नाहीत. ‘माझ्या घरावर भाजपच्या घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. माझ्या कुटुंबीयांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणाचेही काहीच ऐकले नाही. ज्यावेळी हा प्रकार झाला, त्यावेळी मी घरात उपस्थित नव्हतो,’ असे काँग्रेसचे नेते प्यारे खान यांनी सांगितले.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या कृत्यांचे समर्थनच केले आहे. कार्यकर्त्यांकडून झालेला हा प्रकार अतिशय क्षुल्लक असल्याचे भाजप नेते राहुल कोठारी यांनी म्हटले. ‘कार्यकर्ते उत्साहाच्या भरात अशी कृती करतात. भाजपच्या घोषणा घरावर रंगवण्यात काहीच गैर नाही. परिसरात विकासाची कामे होत असल्याने अशा घोषणा चुकीचे काय आहे ?’, असा सवाल कोठारी यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS