मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, 27 जणांना नोटीस

मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, 27 जणांना नोटीस

मुंबई – मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 27 तरुणांना नोटीस पाठवली आहे. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी या नोटिसा पाठविल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, ही कारवाई म्हणजे आणीबाणी असून, सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांचे भ्रष्ट्राचार या विरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसी बळाचा गैरवापर सुरु आहे. पोलिसांनी निवडून पत्रकारांना बोलावणे व चौकशीच्या नावाखाली धमकावणे, ही दुसऱ्या आणीबाणीची चाहूल आहे. पत्रकारांना धमकावणे सरकारला महाग पडेल.”, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निषेध केला आहे.

 

COMMENTS