देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात यंदा पाऊस किती पडणार याकडे देशातील सर्वसामान्यांपासून सर्वांचेच लक्ष आजच्या आयएमडीच्या अंदाजाकडे लागले होते. या अंदाजानंतर सर्वांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे.
मागच्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता. आयएमडीच्या दुसऱ्या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असे भाकीत होते. मात्र मागच्या वेळी सरासरीच्या 97 टक्के इतका पाऊस पडला. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावेळी अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्त केली आहे. शिवाय स्कायमेट या देशातल्या खासगी संस्थेनेही यावेळी अल निनोमुळे सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरात अचानक उष्मा वाढल्याने वातावरणात जे असामान्य बदल घडून येतात, ज्याचा मान्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होतो. भारतात जून ते सप्टेंबर या काळात जवळपास 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळेच पडतो, ज्यावर देशातली बहुतांश शेतीचे सिंचन अवलंबून आहे. आयएमडीच्या या अंदाजानंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS