मनसेच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा मनसे मेळावा यंदा होणार नाही अशी घोषणा राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथे झालेल्या बैठकीत केली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि सर्व विभागप्रमुखांना बोलावण्यात आले होते.
दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे वैयक्तिक कामासाठी परदेशात जाणार असल्याने यंदाचा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. यंदा राज ठाकरे यांनी शोभायात्रा न काढण्याचे ठरवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवामुळे ही शोभायात्रा काढण्यात येणार नसल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुढीपाडवा मेळावा यंदा होत नसला तरीही प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या विभागात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र जमवून कार्यक्रम करावेत असे आदेशही राज ठाकरे यांनी विभागप्रमुख आणि मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. मनसेला निवडणुकीत यश मिळो न मिळो पण पक्षप्रमुखांच्या भाषणाला मात्र खच्चून गर्दी होते. मत न देणारे नागरिकदेखील ठाकरे शैलीतील भाषण ऐकायला आवर्जून उपस्थिती लावतात. पण यंदा हा मनसे मेळावा होणार नाही. ठाकरे कुटुंबात असलेले वाद त्याचबरोबर राजकारणात आलेले अपयश या निर्णयाला कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
COMMENTS