साधारण पणे हवाई सुंदरी(Air hostess), मिस इंडिया किंवा मॉडलिंगमध्ये करियर करायचं असेन तर तुमची उंची- रंग चांगला, दिसायला सुंदर ह्या बाबी महत्वाच्या ठरतात मात्र, तुम्ही कधी ऐकल आहे का, व्यावसायिक होण्यासाठी तुम्हाला ‘सुंदर दिसणे’ आणि ‘चांगली उंची’ ही आवश्यक आहे. होय हे खंर आहे… कारण राजस्थानच्या माध्यमिक शाळेतील पुस्तकातून विद्यार्थ्यांना उत्तम व्यावसायिक होण्यासाठी सुंदर दिसणे आवश्यक असल्याची शिकवण देण्यात येते आहे.
राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. यामध्ये चांगला उद्योजक होण्यासाठी ‘सुंदर दिसणे’ आणि ‘चांगली उंची’ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तम स्वास्थ आणि शालिनता असल्यास चांगले उद्योजक होता येते, असा उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. चांगली उंची, सुंदर रंग आणि गांभीर्यामुळे यशस्वी उद्योजक होता येते, असा अजब ‘धडा’ राजस्थान सरकारच्या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना शिकवला जातो आहे.
या पुस्तकातून विद्यार्थ्यांना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. नववी ते बारावीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका पाठ्यपुस्तकातून स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान कौशल विकास योजना, स्वावलंबन योजना आणि भामाशाह योजनेची माहिती देण्यात आली आहे. यामधील दोन योजना केंद्र सरकारच्या तर दोन योजना राजस्थान सरकारच्या आहेत. याआधी सीबीएसई बोर्डाच्या शारीरिक शिक्षण विषयाच्या एका पुस्तकात महिलांसाठी ‘36-24-36 ‘ फिगर उत्तम आहे असा दावा करण्यात आला होता. बारावीच्या पुस्तकातील या अजब उदाहरणाने सोशल मीडियावर सडकून टीका झाली होती. महिला आणि पुरुष या दोघांच्या आरोग्यावर एक धडा या पुस्तकात देण्यात आला होता. यातील एका परिच्छेदामध्ये महिलांसाठी ‘36-24-36 ‘ ही फिगर महिलांसाठी उत्तम असल्याचे म्हटले होते. म्हणूनच मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड सारख्या स्पर्धांमध्ये ही फिगर उत्तम मानली जाते असे उदाहरणासह स्पष्ट करण्यात आले होते. यासोबतच अशी फिगर हवी असल्यास नियमित व्यायाम करा, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले होते.
COMMENTS