या उन्हाळ्यात आंबा प्रेमींना ‘’योगी मॅंगो’’ आंबाचा अस्वाद घेता येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावरुन या आंबाचं नाव ‘योगी मॅंगो’ असं ठेवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातले ‘मँगो मॅन’ हाजी कलीमुल्ला यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत नव्या जातीच्या आंब्याचे उत्पन्न घेतले असून, या आंब्याचे नाव त्यांनी “योगी मॅंगो” ठेवल आहे.
लखनऊपासून 30 किलोमीटर दूर मलिहाबादमध्ये 74 वर्षांचे पद्मश्री हाजी कलीमुल्ला राहतात. आपल्या नव्या ‘योगी’ आंब्यांबाबत हाजींना खूप उत्सुकता आहे. हा आंबा बारीक, लांब आणि सुंदर आहे. याला पाहताच तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाता, असं वर्णन हाजी करतात. या आंब्याची जात हाजींनी विकसित केलेली नाही. नैसर्गिकरीत्या या जातीच्या आंब्यांचे उत्पन्न त्यांच्या बागेत आले आहे. तो ‘करेला’ आणि ‘दशेरी’ यांच्या मिश्र वैशिष्ट्यांनी तयार झाला आहे.
हाजी कलीमुल्ला म्हणाले की, ‘काही लोक माझ्या आमराईत आले. त्यांना 4-5 वेगळ्या धाटणीचे आंबे दिसले. त्यांनी मला त्या आंब्यांविषयी विचारलं. मी म्हटलं मलाही माहित नाही. ही जात स्वत:च विकसित झाली आहे. तेव्हा त्यांनी सल्ला दिली की या आंब्याच्या जातीला नाव योगी आदित्यनाथांचे नाव द्यावे आणि मी तसेच केले.’ हा आंबा पिकायला अजून महिन्याभराचा अवकाश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आंब्याला दिल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव कलीमुल्ला यांच्या नव्या जातीच्या आंब्याला मिळाले आहे.
हाजी कलीमुल्ला अनेक प्रयोग करत असतात. एखादा यशस्वी झाल्यावर त्याला नाव दिलं जातं. त्यांच्या बागेत ऐश्वर्या आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचेही आंबे आहेत.
COMMENTS