आसाममधील महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आ्रज सकाळी कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आसाममधील विविध समस्या राज यांच्या समोर मांडल्या आहेत. तसेच राज यांनी आसामला भेट देण्याची विनंती या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी ठाकरे यांच्याशी बोलताना ‘वर्किंग प्रेसिडेंट स्वाधीन नारी शक्तीच्या’ पदाधिकारी मौसीन प्रभात बोरा म्हणाल्या, आसामध्ये विकास नाही, तिथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या नाहीत. आता आसाममध्ये बिहार, युपी, गुजरातमधील नागरिक येऊन स्थायिक होत आहेत. तिथल्या बिल्डर लोकांच्या मते या जमिनी मारवाडी, गुजराती लोकांनी खरेदी केलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी राहू शकत नाही. या बिल्डर लोकांना आसाममधील भाजप सरकारचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही राज ठाकरेंना आसाममध्ये येऊन तेथील मूळ रहिवाश्यांच्या हक्कासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यासाठी आम्ही आल्याचे म्हणाल्या.
महाराष्ट्रामधील मराठी माणसाच्या हक्कासाठी, अस्मितेसाठी राज यांनी एक मोहीम उभी केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी आसाममध्ये येऊन तेथील आसामच्या मूळ रहिवाश्यांना मार्गदर्शन करावे. आपण आपला हक्क कसा मिळवू शकतो याविषयीच्या मार्गदर्शनाची आसामच्या जनतेला गरज आहे. ही अवस्था अशीच राहिली तर आसामची संस्कृती नष्ट होईल. आसाममधील सरकार विरुद्ध कोणी सोशल मीडियावर काही पोस्ट केली, तरी आसामचे सरकार त्या व्यक्तीचे जगणे मुश्किल करत असल्याचे त्या म्हणाल्या. आसाममध्ये स्टेट बोर्ड ( एज्युकेशन) बंद केले आहे आणि सीबीएससी बोर्डाच्या शाळा उघडल्या गेल्या आहेत. कारण आसामची संस्कृती तिथल्या भविष्यातील पिढीला समजू नये याकरता हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मौसीन यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमचे काही लोक आता कर्नाटकला जात आहेत. तिथे देखील मराठी बोलणाऱ्या लोकांवर असे अत्याचार होत आहेत. मी स्वतः आसामला येईन पण त्यापूर्वी आमचे काही कार्यकर्ते पक्षाचे सदस्य आसामला भेट देतील, त्या ठिकाणची परिस्थिती पाहतील. तिथल्या लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर मी स्वतः आसामला येऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्याचे आश्वासन राज ठाकरेनी मौसीन यांना यावेळी दिले.
COMMENTS