मुंबई – मुंबईच्या डबेवाल्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुबोध सांगळे याला अटक करण्याच्या मागणीसाठी डबेवाले थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी धडक देणार आहेत. येत्या 3 ऑक्टोबरला डबेवाल्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढणार आहे.
डबेवाल्यांनी www.mumbaidabbewala.in ही वेबसाईट तयार करून घेतली होती. या वेबसाईटचे कामकाज पहाण्यासाठी सुबोध सांगळे या व्यक्तीची नियुक्ती केली होती. सुबोध सांगळे यांनी डबेवाल्यांनची कोणतीही संमती न घेता परस्पररित्या मयुर कांती व त्याचा भाऊ वृषभ कांती यांना मदतीला घेतले व “इंडीया कॉईन” नावाची बोगस कंपनी स्थापन केली. सुबोध सांगळे, मयूर कांती व वृषभ कांती यांनी ही कंपनी डबेवाल्यांचीच आहे असे भासवले. डबेवाल्यांचा सर्व डाटा या कंपनीने वापरला.
सुबोध सांगळे यांनी डबेवाल्यांच्या वेबसाईटद्वारे येणारी कामे व इव्हेंट “इंडीया कॉईन” कंपनीच्या नावे फिरवले. डबेवाल्यांनी केलेली कामे, त्यांची देयके ही सांगळे याने त्यांच्या कंपनीच्या नावे फिरवली. यामुळे डबेवाल्यांचे किमान १ कोटी रुपये “इंडीया कॉईन” या कंपनीच्या नावे फिरवले गेले असल्याचा आरोप मुके यांनी केला आहे. ही रक्कम सुबोध सांगळे, मयूर कांती व वृषभ कांती यांनी हडप केली असल्याची तक्रार डबेवाल्यांनी केली आहे.
सदर तक्रारीच्या अनुशंगाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मयूर कांती व वृषभ कांती यांना अटक करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपी सुबोध सांगळे याला अद्याप अटक झालेली नाही.
सुबोध सांगळे याचा मामा एक नामांकित वकील आहे त्यामुळे त्यांनी आपल्या ओळखीचा पोलिसांवर दबाव आणला असावा अशी शंका डबेवाल्यांना वाटते. त्यातूनच मुख्य आरोपी सुबोध सांगळे यांस अद्याप अटक झालेली नाही. सुबोध सांगळे याला अटक करण्याइतके सबळ पुरावे पोलिसांकडे असताना त्यास अटक करण्यास पोलीस टाळाटाळ का करत आहेत असा सवाल डबेवाले करत आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलीकर, डीसीपी राजीव जैन, एसीपी सुनिल देशमुख यांच्याशी आवश्यक तो पत्रव्यव्हार केला आहे, असेही मुके यांनी सांगितले.
मुख्य आरोपी सुबोध सांगळे यांस अटक होऊन त्याची चौकशी व्हावी म्हणून मुंबईत एक दिवस डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेऊन डबेवाल्यांचा मोर्चा न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे व त्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती डबेवाला ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.
COMMENTS